अखनूर – पाकव्याप्त काश्मीरशिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण आहे. पाकिस्तानच्या दृष्टीने पाकव्याप्त काश्मीर केवळ परदेशी क्षेत्र आहे. त्या देशाने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादाचे जाळे उद्धवस्त करावे. अन्यथा, पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी दिला.
जम्मू-काश्मीरच्या अखनूर भागात माजी सैनिकांचा मेळावा झाला. त्यावेळी बोलताना राजनाथ यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला तीव्र शब्दांत फटकारले. भारताला अस्थिर बनवण्याचे प्रयत्न पाकिस्तान सातत्याने करत आहे. त्यासाठी तो देश दहशतवादाला खतपाणी घालतो. पाकव्याप्त काश्मीरच्या भूमीचा वापर दहशतवादाच्या फैलावासाठी केला जातो.
आजही तिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे तळ सुरू आहेत. दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी सीमेजवळ अड्डे बनवण्यात आले आहेत. भारत सरकारकडे त्याविषयी ठोस स्वरूपाची माहिती आहे. आम्ही पूर्णपणे स्थिती जाणून आहोत. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेला प्रतिष्ठेने जगण्यापासून वंचित ठेवण्यात आले.
त्या जनतेची धर्माच्या नावाखाली पाकिस्तानी सत्ताधीशांनी पिळवणूक केली. भारतविरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी तशी नापाक कृत्ये केली जातात, असे राजनाथ म्हणाले. पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यांना जम्मू-काश्मीरमधील जनतेने कधीच पाठिंबा दिला नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.