सांबा/जम्मू :- जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी हद्दीतून सोडण्यात आलेल्या ड्रोनवर गोळीबार करून ते परतवून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या भागात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली.
रामगढ उप-सेक्टरमधील चमलियाल सीमा चौकीवर देखरेख करणाऱ्या बीएसएफच्या जवानांना पहाटे 2.30 च्या सुमारास पाकिस्तानकडून हवेतील एक लुकलुकणारा लाल दिवा दिसला. जो ड्रोन असल्याचे मानले जाते आणि ते खाली आणण्यासाठी त्यावर दोन डझनहून अधिक फैरी झाडण्यात आल्या. त्यानंतर ते संशयित ड्रोन पाकिस्तानच्या बाजूला परतले.
या ड्रोनमधून सीमाभागात भारतीय हद्दीत कोणतीही शस्त्रे किंवा अंमलीपदार्थ टाकले गेले नाहीत याची खात्री करण्यासाठी चमलियाल, सपवाल आणि नारायणपूर सीमा चौक्यांना लागून असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली. डुग, चन्नी-सपवाल आणि आसमपूर गावातील मोकळ्या मैदानांवरही बीएसएफच्या जवानांकडून शोध घेतला जात आहे.