श्रीनगर : जम्मू काश्मिरच्या अखनूर क्षेत्रात दूरनियंत्रकाच्या सहय्याने घडवलेल्या स्फोटात लष्कराचा एक जवान शहीद झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
सीमावर्ती भागात लष्कराचे पथक गस्त घालत असताना हा स्फोट घडवण्यात आला. हा स्फोट दुरनियंत्रकाच्या सहाय्याने घडवण्यात आल्याचा संशय आहे. या भागाची नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम तीव्र करण्यता आली आहे.
दरम्यान, जम्मू काश्मिरमधील बारामुला जिल्ह्यातील सोपोरे भागातून पाकस्थित लष्कर – ए – तोयबाच्या पाच अतिरेक्यांना शनिवारी अटक करण्यात आली. सुरक्षा दलांसह पोलिसांना राबवलेल्या विशेष मोहीमेत हे अतिरेकी जाळ्यात सापडले.
लष्कर ए तोयबाचे येथील जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या पाच जणांपैकी दोघे टेहळणी करत असत. तर तीन जण स्थानिकांना धमकावून निदर्शने करण्यास भाग पाडत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. टेहळणी करणाऱ्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
या पुर्वी ऑक्टोबर महिन्यात आवंतीपोरा शहराबाहेर सुरक्षा दलांनी लष्कर – ए – तोयबाच्या अतिरेक्याला चकमकीत टीपले होते. त्याची ओळख पटवण्यात यश आले होते. त्याचे नाव उफैद फारूक लोने असे होते. काश्मिर खोऱ्यात अलिकडेच झालेल्या बॉम्बस्फोटात तो सहभागी असल्याचे तपासात आढळून आले होते.त्याच दिवशी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आरएसपुरा भागातून एका पाकिस्तानी घुसखोराला ताब्यात घेतले होते.