जम्मू-काश्‍मीर आणि आपण

लोकांना विश्‍वासात घेणे त्यांना मुख्य प्रवाहात आणणे त्यांच्यात भारतीय मूल्य रूजविणे आवश्‍यक आहे. दोन संविधान, दोन ध्वज आणि प्रत्येक कायदा तयार झाला की, त्याला जम्मू काश्‍मीर अपवाद. यातले आता काहीच नसणार! आता कलम 370 रद्द केल्यामुळे एकच संविधान आणि एकच राष्ट्रीय ध्वज ते पण सर्व कायदे जम्मू ते कन्याकुमारीपर्यंत विना अपवाद लागू होतील.

गेली 70 वर्षे या एकाच विषयावर कायम वाद चालू आहेत. हजारो सैनिक हुतात्मा झाले. विकासाचा पत्ता नाही. तेथील लोकांना आपण भारतीय आहोत, याची जाणीवच करून देऊ शकलो नाही. आजही तेथील लोकांकडे ते काहीतरी वेगळे आहेत, असे आपले वागणे असते! या सगळ्यांवर उपाय म्हणून एक कठोर निर्णय घेणे आवश्‍यक होते. केंद्र सरकारने तो ऑगस्टला घेतला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

या एका निर्णयामुळे देशातील सर्व क्षेत्रातील नागरिकांना आपण नेमकी कोणती भूमिका घ्यावी, हे समजत नव्हते. काहींनी सरकारचा विरोध केला तर काहींनी पाठींबा दिला. तटस्थ भूमिका असणारे अगणित आहेत. काही गोष्टी पटण्यासारख्या नक्कीच नाहीत मात्र, वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या विषयाला मार्गी लावणे ही वेळेची गरज होती. निर्णय झाला आहे. त्यामुळे आता अधिक आकडतांडव करून फायदा होणार नाही. पुढील गोष्टी अधिक आव्हानात्मक आहेत. त्यात तेथील लोकांना विश्‍वासात घेणे सगळ्यात महत्वपूर्ण आहे. कारण बंदुकीच्या धाकात कोणावरही कायम राज्य करता येऊ शकत नाही. जम्मू काश्‍मीरला आपण पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतो! तर या स्वर्गाला जपण्याचे कामही आपल्याच हाती आहे.

जम्मू काश्‍मीरचा निर्णय योग्य – अयोग्य हे वेळच ठरवेल! मात्र, आपल्याला तेथील सुंदर मुलींशी लग्न करता येईल, येवले चहा, चितळे स्वीट्‌स, बिहार – यूपीवाले भेळचा गाडा टाकतील, पवार साहेब जमीन घेतील अशा ना – ना प्रकारच्या बाबी समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. यातून आपल्याला संबंधित परिस्थितीचे किती गांभीर्य आहे हे समजते.

प्रत्येक विषयावर मत मांडणे हे आजच्या समाज माध्यमांमुळे शक्‍य झाले आहे. ते चांगले आहे मात्र, आपल्या अभिव्यक्तीचा किमान आपल्या पातळीवर तरी विचार व्हावा. नेहमी आधी कोण व्यक्त होतो, यावरून सर्रासपणे भूमिका मांडली जाते. यातून जिवंत माणसांना मरण्याआधी मारले जाते! जम्मू काश्‍मीरच्या लोकांची अवस्था महाराष्ट्रात बसून समजणार नाही! किंवा समाज माध्यमांवर चार पोस्ट टाकून आपण मोकळे होऊ, इतका साधा विषय नाहीये हा! यामागे आंतरराष्ट्रीय संबंध, राजकारण, अर्थकारण, भौगोलिक, ऐतिहासिक संदर्भ आहेत. शेवटी, जनभावनेचा विचार होणे क्रमप्राप्त आहे. हा विचार होताना नाण्याची दुसरी बाजूसुद्धा समजून घेणे तितकेच आवश्‍यक आहे.

असंख्य बाबी आहेत, ज्यावरती चर्चा होणे अपेक्षित होते. वर्तमान हा भविष्याचा इतिहास असतो. आपण आपली भूमिका आणि कृती त्या वर्तमानाला साक्षी ठेऊन निभवावी. आपल्या स्वातंत्र्यासाठी कोणीतरी स्वत:चे रक्त आटवले आहे. आज आपली निर्णायक भूमिका असताना ती आपण अधिक सजगपणे पार पाडावी. तरच आपल्याला भारतीय म्हणून घेण्याचा अधिकार आहे. अन्यथा मेरा भारत महान म्हणण्या इथपर्यंत ती मर्यादित राहील.

– श्रीकांत येरूळे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)