नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर व लडाखचे बुधवारी मध्यरात्रीपासून दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन झाले असून यामुळे एक नवा इतिहास घडला आहे. ऑगस्ट महिन्यात घेतलेल्या निर्णयानुसार या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापनेसाठी ३१ ऑक्टोबर हा दिवस निश्चित केला होता. सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले आहेत.
Under the Jammu and Kashmir Reorganisation Act, 2019, the state of Jammu and Kashmir has been divided into two Union Territories — Jammu and Kashmir, and Ladakh, from midnight. pic.twitter.com/XBDGhhmIDA
— ANI (@ANI) October 31, 2019
जम्मू-काश्मीर आणि लडाख यांचे नायब राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत. अनुक्रमे सनदी अधिकारी गिरीशचंद्र मुर्मू व आर.के. माथुर हे दोघे श्रीनगर व लेह येथे होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत नायब राज्यपाल पदाची पदाची शपथ घेणार आहेत. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल या शपथ देणार आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाख यांचे केंद्रशासित प्रदेशांत विभाजन झाल्याने आता देशातील राज्यांची संख्या २८ झाली असून केंद्रशासित प्रदेशांची संख्या ७ झाली आहे.
जम्मू व काश्मीर पुनर्रचना कायदा २०१९ कायद्यानुसार, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र विधिमंडळ राहणार असून लडाख हा विधिमंडळाशिवायचा केंद्रशासित प्रदेश असेल. जम्मू-काश्मीरमध्ये आता पोलीस व कायदा-सुव्यवस्था यावर थेट केंद्र सरकारचे नियंत्रण राहील. तर तेथील जमिनीबाबतचे अधिकार तेथील निर्वाचित सरकारला असतील.