Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांची चकमक सातत्याने सुरू आहे. आज खोऱ्यात अनेक ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
अनंतनाग जिल्ह्यातील हलकन गली येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यापूर्वी श्रीनगरच्या खन्यारमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.
एका घरात एक किंवा दोन दहशतवादी लपून बसल्याचा संशय आल्यानंतर सुरक्षा दलांनी गुप्तचर माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली होती.
सुरक्षा दल संशयास्पद भागात पोहोचताच तेथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार सुरू केला. शुक्रवारी दहशतवाद्यांनी बांदीपोरा येथील सैनिकांच्या छावणीवर हल्ला केला होता.
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक :
श्रीनगरच्या खन्यारमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू होता. गेल्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कधी लष्करी जवानांना तर कधी स्थलांतरित मजुरांना लक्ष्य केले जात आहे.
त्याच वेळी, सुरक्षा दल देखील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सतत शोध मोहीम राबवत आहेत. दहशतवादी अनेकदा घुसखोरीच्या प्रयत्नात गुंतलेले असतात. मात्र सुरक्षा दल त्यांचे मनसुबे सतत हाणून पाडत आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये स्थलांतरित मजूर निशाण्यावर :
जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर दहशतवादी घटनाही सातत्याने समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत परप्रांतीय मजुरांवर हल्ला करण्याची आज तिसरी घटना आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी 6 मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.