श्रीनगरमधील संवेदनशील ठिकाणी पुन्हा निर्बंध

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अधिकाऱ्यांनी आज श्रीनगरच्या काही भागात तसेच काश्मीरमधील संवेदनशील ठिकाणी लोकांच्या जमावावर पुन्हा निर्बंध घातले आहेत.
केंद्राने 5 ऑगस्टला कलम 370 अंतर्गत राज्याचा विशेष दर्जा मागे घेण्याचा आणि दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्याचा निर्णय घेताना जम्मू-काश्मीरमध्ये सर्वप्रथम अंकुश लावला होता. काळानुसार परिस्थिती सुधारत असल्याने खोऱ्यातील बऱ्याच भागांतून टप्प्याटप्प्याने निर्बंध हटविण्यात आले होते. मात्र शुक्रवारी नमाज होण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून शहरासह काश्मीरच्या काही भागात निर्बंध घालण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दर शुक्रवारी खोऱ्यातील असुरक्षित भागात प्रतिबंध लादले जात आहेत, निषेध व्यक्त करण्यासाठी मोठ्या मशिदी आणि प्रार्थनास्थळांमध्ये मोठ्या संमेलनांचे आयोजन केले जाऊ शकते, हे ध्यानात घेऊन हे निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्या एक महिन्यापासून काश्मीरमधील कोणत्याही मोठ्या मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजांना परवानगी देण्यात आलेली नाही.





