कारवाईनंतरही बेशिस्त पार्किंग सुरूच
पुणे – महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीसह आसपासच्या भागातही पालिकेने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने पालिकेत पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक चार पटींनी वाढली आहे. त्या पेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे ही वाहने अतिशय बेशिस्तपणे लावली जात असून सोमवारी दोन्ही मुख्य इमारतींच्या प्रवेशद्वारांसमोरच वाहने पार्क केल्याचे समोर आले. त्यानंतर पालिकेच्या सुरक्षा विभागाने या सर्व वाहनांना जॅमर लावला. मात्र, जॅमर लावल्यानंतर नगरसेवकांच्या सूचनेनुसार, अशा बेशिस्त वाहनचालकांना कोणतीही कारवाई न करता सोडून दिले जात आहे.
महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून पार्किंग केल्या जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढली आहे. महापालिकेत कोणतेही काम नसताना, सकाळी पालिकेच्या समोरील बसथांब्यावरून तसेच शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरून नोकरीसाठी जाणारे अनेक नोकरदार राजरोसपणे या पार्किंगच वापर करत आहेत. त्यामुळे दोन्ही इमारतींच्या पार्किंगमध्ये वाहने लावण्यासाठी जागाच नाही. त्यातच, काही बेशिस्त वाहनचालक आपली वाहने थेट इमारतीच्या प्रवेशद्वारांच्या पायऱ्या समोरच लावत आहेत.
त्यामुळे इमारतीत चालनेही शक्य नाही. ही बाब गांभीर्याने घेत सुरक्षा विभागाकडून जॅमर बसविण्याची कारवाई सुरू केली आहे. मात्र, जॅमर बसवल्यानंतर नगरसेवकांचा वशिला घेऊन येत हे जॅमर काढून घेतले जात आहेत. त्यातच अनेकांची वाहने केवळ समज देऊन सोडली जात असल्याने अशा बेशिस्त वाहनांना कोणताही धाक राहिलेला नाही. त्यामुळे मुख्य इमारतील सार्वजनिक पार्किंगचे स्वरूप आल्याचे चित्र आहे.