जामखेड : तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने सर्वांचे लक्ष लागलेल्या भाजप जामखेड तालुकाध्यक्षपदी अजय काशीद यांची निवड करण्यात आली. अजय काशीद आदर्श गाव असलेले सारोळा गावाचे सरपंच आहेत.
भाजपचे अहमदनगरचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
यापूर्वी काशीद यांनी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, भाजप जिल्हा उपाध्यक्ष या पदावर काम केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेची नगर जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सर्वानुमते या पदावर काशीद यांचीच वर्णी लागावी आहे. माजी मंत्री राम शिंदें यांनी त्यांचा निवडीसाठी प्रयत्न केले.
निवडीनंतर काशीद म्हणाले, पक्षसंघटनेत गेल्या दहा वर्षापासून विविध पदावर आपण काम केले आहे. संघटनेत काम करण्याचा पाठिशी असलेला अनुभव निश्चितपणे मला तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना उपयोगी पडेल.
पक्षाने मला तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. मिळालेल्या संधीचेसोने करून,तालुक्यांमध्ये पक्षाचं संघटन करण्यात येईल असे ते म्हणाले. सर्वाना सोबत घेऊन तळागाळापर्यंत पक्ष मजबूत करणार असल्याचे काशीद म्हणाले.