जामखेड (प्रतिनिधी) – तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात येत असलेल्या गट व गणांची पुनर्रचना होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात विविध राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. दोन महिन्यांवर ही निवडणूक येऊन ठेपली आहे. मात्र, आरक्षणाचा सुरू असलेला घोळ, नव्याने निर्माण होत असलेला जिल्हा परिषदेचा एक गट आणि दोन पंचायत समित्यांचे गण यामुळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्वच राजकीय पक्षांतील उमेदवारांची धांदल उडाली आहे. नेमका कोणत्या गावात संपर्क वाढवायचा, हाच प्रश्न निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना पडला आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेचे 2 गट तर पंचायत समितीचे 4 गण आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषदेचा एक गट तर पंचायत समितीचे दोन गण वाढणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार संभ्रमात सापडले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली होती. सन 2015 पूर्वी जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेचे जामखेड, खर्डा, जवळा असे तीन गट होते तर खर्डा, सोनेगाव, जवळा, अरणगाव, जामखेड, साकत अशी पंचायत समितीची सहा गण होते.
सन 2015 ला जामखेड ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाले. यामुळे जामखेड तालुक्यात जिल्हा परिषद एक गट व पंचायत समितीचे दोन गण कमी झाले. तालुक्यात लोकसंख्येच्या मानाने खर्डा, नान्नज, जवळा, अरणगाव, सोनेगाव,साकत ही गावे तालुक्यात मोठी आहेत. त्यानंतर शासनाने नव्याने गट व गणांची पुनर्रचना करण्याचे आदेश दिले. निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेचा गोपनीय अहवाल तहसील कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयात सादर केल्याचे समजते. नेमके प्रशासन गट दक्षिणेकडून सुरू करते की उत्तर दिशेने सुरू करते, यावरच गट कोणता निर्माण होईल, हे कळेल.
प्रत्येक जिल्हा परिषद गटातून जवळपास साडेतीन हजार मतदार कमी करून एक नवीन गट तयार होणार आहे. गावे कमी होणार असल्याने उमेदवारांचा प्रचाराचा ताण काहीसा हलका होईल, अशी चिन्हे दिसत आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातून नेमकी कोणती गावे जाणार आणि नव्याने कोणते गावे येणार, याचा कोणताही अंदाज येत नसल्याने इच्छुक सैरभैर झाल्याचे चित्र आहे. एका गटामुळे राजकीय समीकरणे बदलणार असून, राजकीय मंडळींना याचा फटका बसू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.साकत व नान्नज या गावांपैकी एका ठिकाणी जिल्हा परिषद गट होण्याची शक्यता आहे.
एक गट, दोन गण नवीन होणार
तालुक्यातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, आणखी एका जिल्हा परिषद गटाची नव्याने निर्मिती होत आहे. तर दोन नवीन पंचायत समिती, गण निर्माण होणार आहेत. हे नवीन होणारे गट आणि गण कोणत्या राजकीय पक्षाच्या फायद्याचे व कोणाच्या तोट्याचे होते ते आगामी काळात कळणारच आहेत.
राजकीय वर्चस्वांसाठी लढत
सध्या तालुक्यात खर्डा व जवळा हे दोन जिल्हा परिषदेच्या जागा भाजपच्या ताब्यात आहेत. तर पंचायत समितीच्या जागा 4 असून त्यात साकत, जवळा, खर्डा, हळगाव यापैकी हळगाव व जवळा दोन गण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असून खर्डा व साकत गण भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे.त्यामुळे तालुक्यातील आगामी जि.प.व पं.स.निवडणुकाही अत्यंत अटीतटीच्या व रंगतदार अवस्थेत होणार आहेत.