जामखेड (प्रतिनिधी) – शनिवारी दुपारी 4 वाजता काही मिनिटांसाठी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने अचानक हजेरी लावली. जोरदार सुटलेल्या वादळ वाऱ्यात करमाळा रोड. खर्डा रोड परिसरासह रस्त्याने झाडे व झाडाच्या फांद्या उन्मळून वीज वाहक तारांवर पडल्याने महावितरण विभागाचे मोठे नुकसान झाले पडुन आरोळे नगर येथे जामखेड करमाळा रस्त्यावरील वीजेचा खांब अडवा झाल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
तालुक्यात मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस कोसळत आहे. अशातच अचानक शनिवारी दुपारी काही क्षणासाठी कोसळलेला जोरदार पाऊस आणि वादळवाऱ्यात चौफुला येथील लिंबाचे मोठे झाड उन्मळून पोलीसाच्या दुचाकीवर पडल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी आलेल्या वादळामुळे झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडली.
त्यामुळे वीज वाहिन्या तुटण्यासह त्यांचे खांब देखील वाकले होते. त्याचबरोबर आरोळेवस्ती येथील जामखेड करमाळा रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीजेचा खांब रस्त्यावर अडवा झाला होता यामुळे तारा तुटुन पडल्याने वाहतूक थांबविण्यात आली होती. अनेक वर्ष जुनी झालेली वृक्ष जमिनीतून सडल्याने ती आता धोकादायक ठरू लागली आहेत.
शहरातील विद्युत पुरवठा वारंवार होतोय खंडीत..!
शहरात वादळ वारे व विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. काल रात्री वादळ वार्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील कांही रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली. त्यामुळे रहदारीस कांही काळ अडथळा निर्माण झाला होता. पावसाळामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. रात्री उशीरा विद्युत पुरवठा सुरळीत झाला.
अनेक घरांवरचे पत्रे वार्याने उडाले. त्यातच वीजपुरवठा खंडीत झाल्याने अंधारात नागरिकांचे हाल झाले. पुन्हा आज दुपारी पाऊस सुरु झाल्यानंतर विद्युत पुरवठा कांही काळ खंडीत झाला होता. विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होऊ नये यासाठी संबंधीत विभागाच्या अधिकार्यांनी त्वरीत याकडे लक्ष घालुन उपाययोजना कराव्यात. अशी मागणी जनतेतून होत आहे.