जामखेड / खर्डा (प्रतिनिधी) – तालुक्यातील खर्डा येथील निंबाळकर गढी म्हणजे मराठे व निजाम यांच्यात झालेल्या खर्ड्याच्या लढाईत महत्त्वाची भूमिका निभावणारे सरदार निंबाळकर यांच्या निष्ठा व शौर्य याची साक्ष देणारे स्मारक आहे.
या स्मारकाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी पुरातत्त्व विभागाकडे निंबाळकर गढी, निंबाळकर छत्री व त्यांचे आराध्य दैवत असलेल्या ओंकारेश्वर मंदिर व बारव यांच्या संवर्धन व संरक्षणासाठी त्यांना संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता.
आ. पवार यांच्या पाठपुराव्याची दखल घेत पुरातत्व विभागाने निंबाळकर गढी, निंबाळकर छत्री, ओंकारेश्वर मंदिर व बारव हे संरक्षित स्मारक असल्याचे जाहीर केले आहे. या अंतर्गत या स्मारकांच्या संवर्धन जतन व विकासासाठी सरकारकडून वेळोवेळी निधी देण्यात येईल व यामुळे सरदार निंबाळकरांच्या व खर्ड्याच्या गौरवशाली इतिहासाला एक नवी झळाळी मिळेल.