जामखेड (प्रतिनिधी) – तालुक्यातील सन 2018-2019 मधील खरीप अनुदान आणि 2015-2016 मधील रब्बी अनुदान मिळनेकामी कागदपत्र जमा करण्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
जामखेड तालुक्यात सन 2018-2019 मधील खरीप अनुदान आणि 2015-2016 मधील रब्बी अनुदान शासनाकडून मंजूर झाले होते. सदर अनुदान जामखेड मधील सर्व शेतकरी यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले होते. परंतु काही ठिकाणी बँक खाते क्रमांक चुकल्याने, सामायिक खाते असल्याने, आयएफएससी (IFSC) कोड चुकल्याने किंवा इतर कारणाने ज्या लोकांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे वर्ग झालेले नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावाचे संबंधित तलाठी यांचे कडे 31 जानेवारी 2022 अखेर आपले बँक खाते पासबुक प्रत जमा करावे, अशी माहिती तहसीलदार चंद्रे यांनी दिली आहे.
तसेच, सदर अनुदान मार्च 2022 अखेर शासनाला परत करावे लागणार असल्याने सर्व प्रलंबित खातेदार यांना प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, आपण 31 जानेवारी 2022 अखेर आपली माहिती आपले गावाचे संबंधित तलाठी यांचेकडे जमा करावी, जेणेकरून सदर अनुदानाची रक्कम खातेदारांना वाटप करता येईल.
सदर माहिती न दिल्यास आणि त्यानंतर अनुदानाची रक्कम शासन स्तरावर वर्ग झाल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही याची सर्व खातेदार यांनी नोंद घ्यावी. प्रलंबित सर्व खातेदार यांची यादी कार्यालयाकडे असल्याने ज्यांना अनुदान वाटप झाले आहे अशा कोणीही खातेदार यांनी परत आपली माहिती देऊ नये अशी सूचना देखील प्रशासनाने दिली असल्याची माहिती तहसीलदार चंद्रे यांनी दिली आहे.