जामखेड तालुक्‍यातील चोऱ्यांमागे आंतरजिल्हा टोळी?

नगर, बीड, उस्मानाबाद, सोलापर जिल्ह्यातील चोऱ्यांची पद्धत सारखीच

जामखेड – जामखेड तालुक्‍यात होत असलेल्या छोट्या-मोठ्या चोरीच्या घटनेमागे शेजारील बीड, उस्मानाबाद, सोलापूर येथील टोळ्यांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला. जामखेड पोलिसांनी त्या दृष्टीने कारवाई करण्यासाठी ठोस पाऊले उचलली आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष पथके तयार केली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जामखेड तालुका नगर जिल्ह्यात आहे. मात्र तालुका चार जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे. यामध्ये बीड, उस्मानाबाद, सोलापूर, नगरचा समवावेश होतो. जामखेडजवळ असल्याने बाहेरील जिल्ह्यातील चोर जामखेड तालुक्‍यात चोरी करून शेजारील जिल्ह्यात पळून जातात. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. दोन दिवसांपूर्वी जामखेड तालुक्‍यातील धोत्री येथील जाधव वस्तीवर दादासाहेब जाधव यांच्या घरी जबरी चोरी करण्यात आली होती. यामध्ये 75 हजाराचे दागिने चोरांनी लंपास करून कुटुंबियांना मारहाण केली. यामध्ये आजिनाथ जाधव हे गंभीर जखमी होते.

त्याचप्रमाणे गेल्या पंधरा दिवसापूर्वी राजुरी गावातील कॅनरा बॅंकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न झाला. बॅंकेचे शटर तोडून सीसीटीव्ही यंत्रणेचा 13 हजार रूपये किंमतीचा डी.सी.आर. घेऊन चोरांनी पोबारा केला. दुसरीकडे याच दिवशी पहाटेच्या दरम्यान खर्डा शहरातील येवले कलेक्‍शन, सुंदरम कलेक्‍शन व आशीर्वाद परमीट रूम या तिन्ही दुकानांचे शटर उचकटून 47 हजार 550 रूपये रोख व परमीट रूममधून काही विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्याचा गुन्हा जामखेड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता.

या सर्व घटनेतील चोरी एकसारख्या पद्धतीनेच झाल्याचा संशय व्यक्‍त केला जात आहे. आंतर जिल्हा टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. काही दिवसांपूर्वी अरणगाव येथे जिल्हा बॅंकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न याच टोळीने केला होता. नगर, बीड, सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातही या टोळीने उपद्रव माजवला आहे. या चार जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये एक सारखीच पद्धत वापरली असल्याचे आढळून आले आहे. यादृष्टीने कारवाई करण्यासाठी ठोस पाऊले उचलत पोलिसांची विविध पथके नेमून लवकरच ही टोळी पोलिसांच्या हाती लागले, अशी माहिती पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी दिली.

पोलीस ठाण्यात रिक्‍त पदे…

जामखेड पोलीस ठाण्यामध्ये रिक्‍त एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक पदे रिक्‍त असल्याने अधिकाऱ्यांवर अनेक गुन्हाचा तपास लावण्याचे अतिरिक्‍त काम असते. त्यामुळे जामखेड पोलीस ठाण्यात रिक्‍तअसलेल्या पदावर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)