राष्ट्रवादीतर्फे जामखेडमध्ये आक्रोश मोर्चा

ई.व्ही.एम मशीनची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

जामखेड – भाजप सरकारच्या निवडणूक यशाचे मुख्य कारण जनाधार नाही तर ई.व्ही.एम. मशीन आहे. याच मशीनची प्रतिकात्मक प्रेतयात्रा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जामखेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांसह वाजत गाजत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, माजी जि.प सदस्य मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, दत्तात्रेय वारे, तालुका युवक अध्यक्ष शरद शिंदे, ऍड नितीन गोलेकर, ओबीसी सेलचे प्रदेश प्रवक्‍ते डॉ. कैलास हजारे, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्‍ते अवधूत पवार, कर्जतचे बाळासाहेब शिंदे, अमजद पठाण, नगरसेवक अमित जाधव, दिंगाबर चव्हाण, पवन राळेभात, संजय वराट, विश्वनाथ राऊत, समिर पठाण, नितीन हुलगुंडे, संभाजी राळेभात, उमर कुरेशी, अमोल गिरमे, राजेंद्र गोरे, हरिभाऊ आजबे, नरेंद्र जाधव, गणेश हागवणे, भिमराव पाटील यांच्यासह तालुक्‍यातील पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना फाळके म्हणाले, या सरकारने मोठमोठ्या घोषणा करून जनतेची फसवणूक केली. आज मराठा धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार भुलभुलय्या करत आहे.शेतकऱ्यांना तर देशोधडीला लावले असून त्यामुळे शेतकरी आज आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे भाजपचा परतिचा प्रवास सुरू झाला आहे. मतदार संघाला कधी नव्हे ते पालकमंत्रीपद मिळाले पण त्याचा उपयोग राम शिंदे यांनी केला नाही. फक्त आपल्या स्वतः साठी केला. कोटींच्या आकड्यांची घोषणा करून जनतेची दिशाभूल केली आहेत.

कुकडीचे पाणी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात आले. ते ही कमी खर्चात आता राम शिंदे हजारो कोटी रुपये आणल्याचे सांगत आहेत. कर्जत एसटी डेपो सुरू केल्याचे सांगितले. प्रत्यक्षात डेपो मंजूर नाही. जुन्या बस आणुन दिल्या आहेत. त्याही बंद असलेल्या मतदारसंघात रस्त्यासाठी मोठा निधी आला. पण आज रस्त्यावर खड्डे का खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे. शिंदे यांनी एकतरी विकासाचे काम दाखवावे, आता जिल्हा राष्ट्रवादीमय करून पालकमंत्री राम शिंदे यांना सुरूंग लावायचा आहे. यासाठी आपण सर्वांनी गट तट विसरून कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

उडीद व मुग खरेदी केंद्र सुरू करावे, शेतीमालाला हमीभाव देऊन स्वामीनाथन आयोग लागु करण्यात यावा, शासनाने मागील वर्षी खरेदी केलेल्या उडीद, हरभरा व तुरीचे पैसे त्वरित अदा करण्यात यावेत, बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित अनुदान द्यावे, दुधाला तीस रुपये लिटर भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, खरीप पिकाला अनुदान देण्यात यावेत व जामखेड तालुका अवर्षण प्रवणग्रस्त जाहीर करावा, भुजल व्यवस्थापन अधिनियम 2009 ते 2018 कायदा रद्द करावा, पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करावी, वीज दरवाढ कमी करावी, मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी अशा विविध मागण्या या मोर्चा दरम्यान करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)