Jamkhed: ऐन सणासुदीच्या काळात जामखेड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, महिलांवर पाळत ठेवून भरदिवसा दागिने ओरबाडण्याच्या ‘धूमस्टाईल’ चोऱ्यांमुळे शहर हादरले आहे. शुक्रवारी दुपारपासून रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील ३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले, तर एका महिलेचा प्रतिकारामुळे बचाव झाला. विशेष म्हणजे, पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरही चोरीचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हळदी-कुंकू कार्यक्रमाचा चोरट्यांनी घेतला फायदा – सध्या मकरसंक्रांतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमांसाठी महिला मोठ्या उत्साहाने दागिने परिधान करून घराबाहेर पडत आहेत. नेमकी हीच संधी साधून दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेल्या माहितीनुसार, दागिने घातलेल्या महिला या चोरट्यांच्या ‘टार्गेट’वर आहेत. एकाच दिवशी तीन ठिकाणी थरार पहिली घटना: सारोळा रोडवर एक महिला पायी जात असताना पाठीमागून वेगाने आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २ तोळ्यांचे गंठण हिसकावले. झटापटीत १ तोळ्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. दुसरी घटना: एच. यु. गुगळे यांच्या दुकानातून खरेदी करून बाहेर पडलेल्या एका महिलेवर पाळत ठेवून चोरट्यांनी चक्क पोलीस स्टेशनजवळच त्यांना गाठले. गाडी आडवी लावून दागिने ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेने धाडसाने प्रतिकार केल्याने चोरट्यांचा डाव फसला. पोलिसांनी तातडीने पाठलाग केला, मात्र चोरटे मोरे वस्तीमार्गे बीड रोडकडे पळून गेले. तिसरी घटना: बीड रोडवरून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम उरकून घरी परतणाऱ्या महिलेला याच चोरट्यांनी गाठले आणि त्यांच्या गळ्यातील २ तोळ्यांचे दागिने लंपास करून पोबारा केला. गस्त वाढवण्याची मागणी – याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे अधिक तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! भरदिवसा आणि गजबजलेल्या भागात महिला सुरक्षित नसल्याचे या घटनांनी पुन्हा सिद्ध झाले आहे. पोलीस प्रशासन रात्रीची आणि दिवसाची गस्त वाढवणार का? आणि या टोळीचा कायमचा बंदोबस्त कधी होणार? असा संतप्त सवाल आता जामखेडकर विचारत आहेत. हेही वाचा – Today TOP 10 News: अजित पवार उपमुख्यमंत्री पद सोडणार?, 400 कोटींची चोरी ते तिसऱ्या महायुद्धाची भीती… वाचा आजच्या टाॅप बातम्या