पुणे – दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचे पडसाद पुण्यातही उमटले. कारवाईचा निषेध करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलन केले. अनिकेत कॅन्टीनजवळ एकत्रित येत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. या वेळी जामिया मिलिया विद्यापीठातील काही विद्यार्थी देखील हजर होते.
सतीश गोरे म्हणाला, आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा विरोध करत आहोत. हा कायदा समाजात दुफळी निर्माण करणारा आहे. विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करून हा विषय सरकार विरुद्ध विद्यार्थी करण्याचा प्रयत्न आहे. परंतु आम्ही तो होऊ देणार नाही. दरम्यान, दि. 18 रोजी विद्यार्थ्यांकडून पुणे विद्यापीठात मशाल रॅलीदेखील काढण्यात येणार आहे.