नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ दिल्ली विद्यापीठात निदर्शने करण्यात आली.
विद्यापीठाच्या उत्तरेकडील भागात समाजशास्त्र विभागात या निदर्शनांना सुरवात झाली. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकत जामिया आणि आलिगढ विद्यापीठातील सहकाऱ्यांविषयी सहानुभूती व्यक्त केली. दरम्यान आंदोलनाला सुरवात करताच त्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अडथळा आणल्याचा आरोप केला जात आहे.
आम्ही सककाळी परीक्षेसाठी आलो. त्यावेळी निदर्शने करणाऱ्या 15-20 जणांशी पोलिस गैरवर्तन करत असल्याचे पाहिले. त्यामुळे जामिया मिलियामध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्याचे आम्ही ठरवले. सुमारे 60-70 जण शांततेत घोषणाबाजी करत होतो. 70-80 पोलिस तेथे होते. त्यावेळी अभाविपच्या चार ते पाच गुंडांनी तेथे येऊन काठीने मारहाण करायला सुरवात केली. आम्हाला मारणाऱ्या विद्यार्थ्यांशी पोलीस बोलत होते. पोलिसांनी आम्हाला कसलेही संरक्षण दिले नाही, असे आंदोलकनकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना जबरदस्तीने बाहेर नेले. त्यावेळी शेजारच्या कला शाखेतील विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरवात केली. दरम्यान काही विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांना परीक्षेला जाणद्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते. त्यावर पोलिस लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतले नाही. तसेच बळाचा वापर केला नाही, असे पोलिस उपायुक्त (उत्तर) मोनिका भारद्वाज यांनी सांगितले.