वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आगामी हंगाम 2022-23 साठी केंद्रीय कराराची घोषणा केली. बोर्डाने जाहीर केलेल्या केंद्रीय करारांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेल, अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलला या यादीत स्थान देण्यात आले आहे.
तर सध्या आयपीएलमध्ये खेळत असलेल्या अनुभवी अष्टपैलू जिमी निशमला वगळण्यात आले आहे. निशमने 2019 मध्ये चमकदार कामगिरी करत संघाला वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत नेले. तसेच गतवर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही त्याने न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले होते. निशमने शेवटचा कसोटी सामना 2017मध्ये खेळला होता. गेल्या एका वर्षात त्याने केवळ 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
यादरम्यान त्याची कामगिरी चांगली झाली नाही. निशमच्या जागी ब्रेसवेलचा करारात समावेश करण्यात आला आहे. नुकताच त्याचा इंग्लंड दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. ब्रेसवेलने याच वर्षी मार्चमध्ये नेदरलॅंड्सविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.