मुंबई – धडाकेबाज कामगिरीमुळे जेम्स बॉण्ड म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मदतीसाठी सरकारने राष्ट्रीय उपसल्लागारांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी मराठमोळे राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर अंतर्गत सुरक्षा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोण आहेत दत्ता पडसलगीकर?
पडसलगीकर यांनी यापूर्वी ‘आयबी’मध्ये संचालकपदावर आपली सेवा बजावली आहे. प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पडसलगीकर यांची ख्याती आहे. पडसलगीकर यांनी गुप्तहेर खात्यात कर्तव्य बजावताना अनेक किचकट मोहिमा हाताळल्या. दहशतवाद, दहशतवादी संघटनांबाबत त्यांचा अभ्यास दांडगा आहे. पडसलगीकर हे १९८२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण तपासात त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी मुंबई हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील धागेदोरेही शोधून काढले होते. याव्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांच्या अनेक कामांची दखल घेत त्यांची राष्ट्रीय उप-सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मानित कऱण्यात आले आहे.