“जेम्स बॉन्ड’ सीरिजचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला

“जेम्स बॉन्ड’चा एक मोठा चाहता वर्ग आहे. आता “जेम्स बॉन्ड’ सीरिजचा 25वा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नाव काय असेल याची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. तर आता त्याचाही खुलासा झाला आहे. या चित्रपटाचे शीर्षक “नो टाइम टू डाय’ असे असणार आहे. सीरिजच्या सोशल अकाऊंटवर 30 सेकंदाचे टीजर पोस्टर करून या नावाची घोषणा करण्यात आली. भारतात 3 एप्रिल 2020 मध्ये “नो टाईम टू डाय’ प्रदर्शित होईल.
हॉलिवुड अभिनेता डॅनियल क्रेग पाचव्यांदा जेम्स बॉन्डची भूमिका साकारणार आहेत. दिग्दर्शक कैरी जॉजी फुकूनागा चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात जेम्स बॉन्डची एक नवी कथा दाखवली जाणार आहे. जेम्स बॉन्डने निवृत्त होऊन जमैकामध्ये शांततेत आयुष्य जगत असताना सीआयएचा त्याचा जुना मित्र त्याला मदत मागतो आणि यानंतर एका अपहृत शास्त्रज्ञाला वाचवण्याचे मिशन सुरु होते, असे याचे ढोबळ कथानक आहे.
“जेम्स बॉन्ड’सीरिजच्या या 25 व्या चित्रपटाचे शूटींग सुरु असताना अनेक वाद व अपघात झालेत. मे मध्ये शूटींग सुरु असताना डॅनियल क्रेग जखमी झाला होता. यानंतर त्यांना एक लहान शस्त्रक्रिया करावी लागली होती. जूनमध्ये पाईनवूड स्टुडिओत लावण्यात आलेल्या सेटवर स्फोट झाला होता. या स्फोटात सेटचे प्रचंड नुकसान झाले होते.





