नांदेड – नियोजित जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वागत केले आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन समारोहाला संबोधित करताना उपमुख्यमंत्र्यांनी ही भूमिका व्यक्त केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले की, मार्च २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून आम्ही कामाला सुरूवात केली होती. हा प्रकल्प आता भूसंपादनाच्या टप्प्यात असून, त्यासाठी गेल्या अधिवेशनात २५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, भूसंपादनाला लागणारा एकूण निधी अंदाजे २ हजार कोटी रूपये आहे. त्यामुळे शासनाने येत्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीच्या माध्यमातून आणखी १ हजार कोटी रुपये द्यावेत, अशी आमची मागणी आहे. या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्र्यांनी आज केलेले वक्तव्य स्वागतार्ह आहे व अर्थ विभाग त्यांच्याकडेच असल्याने ते या प्रकल्पाला आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देतील, अशी आशा आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन समारोहानंतर उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना अशोक चव्हाण यांनी अनेक मुद्यांकडे लक्ष वेधले. कै. नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन अमृतमहोत्सवी वर्षात हे स्मारक पूर्णत्वास नेण्याचा आमचा मानस होता. या ऐतिहासिक वर्षात हे स्मारक पूर्ण करणे कै. नरहर कुरुंदकर यांना आदरांजली ठरेल. नवीन सरकारने हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी, असेही चव्हाण म्हणाले.
याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांना शासनाने दिलेल्या स्थगितीमुळे रस्ते, पूल, इमारती, विश्रामगृहे, निवासी इमारती, रस्ते परिरक्षण व विशेष दुरुस्ती, पूरहानी दुरुस्तीची आदी थांबलेली कामे, नांदेड येथे विभागीय आयुक्त कार्यालय, नांदेड येथे शासकीय कृषि महाविद्यालय, विद्युतीकरणासह लातूर ते नांदेड नवीन ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पास केंद्र सरकारची मान्यता, नांदेड येथे पोलीस आयुक्तालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथे अतिविशेषोपचार रुग्णालय, पिंपळढव साठवण तलाव, ता. भोकर या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता, इसापूर उजवा कालव्याची विशेष दुरुस्ती आदी विषयही अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष मांडले.