जिल्ह्यातील 44 रूग्णांची कोरोनावर मात
जालना(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील मापेगावं येथील एका 45 वर्षीय रुग्णाचा आज शनिवारी पहाटे एक वाजता जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली. मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या लाळेचे नमुने घेऊन ते प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मापेगाव येथील एक 45 वर्षीय इसम काल शुक्रवारी दुपारी न्यूमोनिया आजारावर उपचार घेण्यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल झाला होता. उपचारासाठी दाखल होताना सदर रूग्णांची प्रकृती गंभीर झाली होती.रात्री उशिरा सदर रूग्णांची प्रकृती चिंताजनक होऊन आज शनिवारी पहाटे एक वाजता निधन झाले. या रुग्णाच्या लाळेचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे डॉ.राठोड यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील 123 कोरोना बाधित रुग्णांपैकी काल शुक्रवार पर्यंत 32 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
काल शुक्रवारी दुपारी पुन्हा 12 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे निगेटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या एकूण 44 रुग्णांनी कोरोनावर मात करत आपले घर गाठले असल्याने जिल्हावासीयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 44 रुग्णांना सुट्टी देण्यात आल्यामुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात आता 52 रुग्णांवर उपचार सुरू असून अंबड,मंठा,परतूर, आणि घनसावंगी येथील कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे डॉ.राठोड यांनी स्पष्ट केले आहे