जाळीमंदी पिकली करवंद…

काळी काळी मैना डोंगरची मैना म्हणून लहानपणी आम्ही खूप करवंदे खाल्ली, मात्र अलीकडच्या काळात करवंदे शोधूनही मिळ्त नाहीत. ती पाहायला मिळाली. गेल्या रविवारी. एका कार्यक्रमासाठी कोकणात गेले होते. कोकणात म्हणजे आंबोलीला. खरं तर आंबोली हे एक छोटेसे हिलस्टेशन. टुमदार. ते कोकणात का असा प्रश्‍न मला अनेकदा पडतो. पण आहे, तेही चांगलेच आहे. आंबोलीतील मुक्काम अर्ध्या दिवसाचाच होता. एका मैत्रिणीच्या वडिलांचा कार्यक्रम होता तेथे. त्यांनी काही तरी सामाजिक कार्य केले होते. त्यांना पारितोषिक मिळाले होते, त्यानिमित्त आंबोलीत एक गेट टुगेदर करण्यात आले होते. मी माझ्या काकांबरोबर तेथे गेले.

खरे तर आम्हाला त्या सत्कार समारंभात काही फारसा इंटरेस्ट नव्हता. पण आंबोली पाहायची म्हणून आम्ही गेलो. रखरखीत उन्हाळा असल्यामुळे आंबोलीत ते प्रसिद्ध धबधबे पाहण्याचा प्रश्‍नच नव्हता. तरीही तिथले पॉईंट पाहायचे म्हणून आम्ही रिसॉर्ट वरून बाहेर पडलो चालत चालत स्टॅंण्डवर गेलो, तर तेथे करवंदे विकायला ठेवलेली दिसली. काही महिला आणि दोनतीन मुले करवंदे विकत होते. चांगली टप्पोरी काळीभोर करवंदे. तसली करवंदे पाहूनच मला किती तरी वर्षे झाली आहेत. आपल्याकडे मिळतात ती कसली वाटाण्याएवढे सुरकुतलेली आणि फारशी आंबटगोड नसलेली करवंदे.

इथे तर चांगली टप्पोरी, चमकदार काळीनिळी छोटी जांभळे असावीत अशी करवंदे होती. पाहूनच तोंडाला नुसते पाणी सुटले. आणि होतीही अगदी स्वस्त, दहा रुपयात मोठे द्रोण शिगोशिग भरून करवंदे लावली होती. आम्ही सर्व मैत्रिणींनी पिशव्या भरभरून करवंदे घेतली. परत येताना पुण्याला आणण्यासाठी.

माझ्या एका मैत्रिणीने सहज विचारले, कोठून आणता तुम्ही ही करवंदे? ती बाई हसली. म्हणाली, करवंदे तोडणे साधे काम नाही बाई. करवंदाची जाळी असतात. काटेरी असतात. त्यातून करवंदे काढायची तर हातापायाला काटे लागतात. आम्हाला आता सवय झाली म्हणून काही वाटत नाही. पण ते तुमच्यासारख्या नाजूक मुलींचे काम नाही. हे ऐकताच चंदा, माझी मैत्रीण म्हणाली, आम्ही तशा नाजूक नाही बरंका। चला आम्हला दाखवा करवंदांची जाळी. आता पिकलेली करवंदे नाही मिळायची, ती म्हणाली. आम्ही सकाळीच ती तोडली. आम्हाला पिकलेली करवंदे नको. कच्चीसुद्धा नको, आम्हाला करवंदाची जाळी पाहायची आहेत. तुमची सगळी करवंदे आम्ही विकत घेतो. मग तर आमच्या बरोवर याल ना?

आता सगळी करवंदे विकत घेतो म्हटल्या वर ती बाई आणि तिची सोबतीही खुष झाली. तयार झाली. म्हणाली, तुमच्या घरच्यांना सांगून या. आम्ही रिसोर्टवर जाऊन घरच्यांची परवानगी घेतली, तेथला एक सिक्‍युरिटी सोबत घेतला. आणि निघालो.

तीनचार मैल काट्याकुट्यातून दगडधोंड्यातून चालल्यावर आम्ही रानात आलो. आणि तेथील दृष्य पाहून एकदम प्रसन्न झालो. पूर्वी कधीही न पाहिलेले दृष्य. करवंदाची जंगलेच्या जंगले. त्यांना करवंदाची जाळी म्हणतात म्हणे. सगळीकडे करवंदाची जाळीच जाळी. आम्ही वारा प्यालेल्या वासराप्रमाणे सुटलो. प्रत्येकीने वेगवेगळी जाळी पकडली. हिरवीगार तपोरे करवंदे तोडायला सुरुवात केली. सोबत पिशव्या होत्याच. करवंदाचे लोणचे करायचे म्हणून पिशव्या भरभरून करवंदे भसाभस तोडली. हातांना किती ठिकाणी ओरखडून घेतले, पण त्याचे काहीच वाटले नाही.

असा रानमेवा आणि रानातला आनंद शोधूनही मिळत नाही. चंदामुळे आज आम्हाला तो मिळाला होता. मुळात आम्ही कधी करवंदाची जाळीच पाहिली नव्हती. ती पाहिल्यानंतर प्रत्येकीने मोबाईल काढले आणि फोटो काढायला व्हिडियो शूटिंग करायाल सुरुवात केली. त्या बायांना मोठे नवल वाटले, की या करवदांच्या जाळ्यांचे या मुलींना एवढे कौतुक का? पण आम्ही कधी स्वप्नातही ते पाहिले नव्हते, हे त्यांना कसे कळावे।

सिक्‍युरिटी चला चला म्हणेपर्यंत आम्ही उन्हात घामाघूम होत तेथे बागडत होतो. करवंदे तोडत होतो. लहान मुलांसारखा आनंद झाला होता आम्हाला. शेवटी आम्ही नाइलाजाने परत फिरलो. इकडे त्यांचा कार्यक्रम संपत आला होता. भोजन करून निघायची तयारी चालू होती. पण आम्हाला मात्र भूक नव्हती. अचानक खजिना सापडावा तसा आम्हाला आनंदाचा ठेवा सापडला होता. येताना चंदा गुणगुणत होती, जाळीमंदी पिकली करवंद…

– मृणाल गुरव

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.