जळगाव – लॉकाडाऊनच्या काळात आर्थिक परिस्थितीचा सामना न करु शकल्याने एका सलून व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावा जिल्ह्यात घडली. गजानन कडू वाघ (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास गजानन यांनी राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबियांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गजानन वाघ एक वर्षांपूर्वी जळगाव येथे स्थायिक झाले होते. जळगावच्या लक्ष्मीनगर भागात ते एका भाड्याच्या खोलीत राहत होते. गजानन यांना एका सलूनच्या दुकानात काम मिळाले होते. मात्र लॉकडाऊनच्या काळात सलून बंद पडले आणि गजानन यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. काही दिवस दुकान मालकांकडून त्यांना मदत मिळाली परंतु त्यानंतर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.
घर चालवण्यासाठी व्याजाने पैसे घेतले. लॉकडाऊन वाढत गेला आणि घेतलेल्या पैशांचे व्याज वाढत गेले. पैसे परत करण्यासाठी देणेकरांनी गजानन यांच्यामागे तगादा लावला. त्यामुळेच गजानन यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
गजानन यांचा रविवारी सकाळी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यानंतर गजानन यांचा भाऊ इश्वर यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले मात्र डाॅंक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. रविवारी दुपारी गजानन यांच्यावर माळपिंप्री यामुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत गजानन वाघ यांना पत्नी आणि दोन मुले आहेत.