जळगाव – मकरसंक्रांतनिमित्ताने राज्यभर पतंगोत्सव पाहायला मिळतो. बालगोपाल पतंग उडवून आनंद घेत असतात. अशातच पतंग उडविताना विजेच्या तारेचा शाॅक लागून दहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना जळगावातील कुसुंबा गावात शुक्रवारी दुपारी घडली. हितेश ओंकार पाटील (वय 10) असे मृत्यू पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. मुलाच्या मृत्यूने कुटूंबावरच दुःखाची संक्रांत ओढवली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
हितेश मित्रांसोबत मोकळ्या मैदानात पतंग उडवायला गेला होता. पतंग उडवीत असताना विजेच्या तारांमध्ये अडकला. हा पतंग काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला विजेच्या तारेचा शॉक लागला. हा प्रकार घडल्यानंतर ग्रामस्थांनी त्यास तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल कळसकर यांनी त्यास मृत घोषित केले.