श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा काश्मीरमधील स्वयंघोषित म्होरक्या कारी यासीर याचाही समावेश आहे. त्या कारवाईमुळे प्रजासत्ताक दिनी मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उधळला गेला आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्याआधारे दहशतवाद्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. त्या मोहिमेवेळी झडलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. त्यामध्ये यासीरचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले. मागील वर्षी जैशने पुलवामात भयंकर हल्ला घडवला. त्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले.
त्या हल्ल्याच्या कटात यासीर सामील होता. त्याचा खात्मा सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. दरम्यान, चकमकीत लष्कराचे तीन जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. यासीर ठार झाल्याने काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या बहुतांश म्होरक्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.