माले, (मालदीव) – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर मालदीवच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील जनतेच्या हितासाठी द्विपक्षीय संबंध घट्ट करण्यावर विशेष भर दिला.
द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी जयशंकर तीन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर आहेत. मालदीवमध्ये गेल्या वर्षी चीन धार्जिणे मुइझ्झू यांचे शासन सत्तेवर आल्यापासून भारताच्या वरिष्ठ नेत्याचा हा पहिलाच मालदीव दौरा आहे. जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी मुइझ्झू भारतात आले होते.
जयशंकर यांनी सर्वप्रथम मालदीवचे संरक्षण मंत्री घसान मामौन यांच्याशी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या मुद्यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी मालदीवमध्ये चीनची वाढती उपस्थिती लक्षात घेऊन या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य कायम राहण्याच्या गरजेवर भर दिला. मुइझ्झू यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच मालदीवच्या सेवेतील विमानसेवेसाठी तैनात भारतीय सुरक्षा रक्षकांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांच्यानिमंत्रणावरून जयशंकर मालदीवच्या दौऱ्यावर गेले आहेत. मालदीव हा भारताचा सागरी शेजारी देश असून शेजारी प्रथम हे धोरण आणि सागर दृष्टीकोनानुसार महत्वाचा भागीदारही आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.