दोहा : नाविन्यपूर्ण आणि सहभागी करून घेण्याच्या मुत्सदेगिरीच्या आधारे रशिया आणि युक्रेन दरम्यानचा संघर्ष थांबवता येऊ शकेल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. आखाती आणि भूमध्य प्रदेशातील संघर्षांमुळे भारतासह अनेक देशांसाठी तेल आणि खतांच्या किंमती भडकल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान यांच्या निमंत्रणावरून दोहा फोरममध्ये सहभागी होण्यासाठी जयशंकर दोहा येथे गेले आहेत. कतारचे पंतप्रधान आणि नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री एस्पेन बार्थ एडी यांच्याबरोबरच्या परिसंवादामध्ये ते बोलत होते. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडून आणि काही पाश्चात्य शक्तींकडून ६० च्या किंवा ७० च्या दशकामध्ये जगभरातील संघर्षांवर नियंत्रण ठेवले जात होते. मात्र तो कालावधी आता मागे पडला आहे.
आता प्रत्येक देशाला या तंटा निवारणासाठी पुढे यावे लागेल. मुत्सदेगिरीमध्ये अधिक नाविन्यता आणि सर्वसमावेशकता आणण्याची गरज आता निर्माण झाली आहे. पाश्चात्य शक्तींना वगळून या मध्यस्थीच्या प्रयत्नात अधिक देशांनी सहभागी सहभागी होण्याची गरज आहे, असेही जयशंकर म्हणाले. रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या संघर्षामध्ये ही मुत्सदेगिरी अधिक वास्तव असायला हवी आहे, असे जयशंकर यांनी आवर्जुन सांगितले.
रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी भारताने वेगवेगळ्या पातळ्यांवर कसा संवादसाधला आहे. ही चर्चा अशीच सुरू ठेवली तर वाटाघाटी घडवून आणणे सोपे जाईल, असे पाश्चात्य देशांनाही वाटायला लागले होते, हे देखील जयशंकर यांनी यावेळी नमूद केले.