दिल्लीवर हल्ला करण्यासाठी जैशची आणखी दोन संघटनांशी हातमिळवणी

दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी…सर्वच भागात सुरक्षा व्यवस्थेत वाढ

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे. त्यातच पाककडून वारंवार सीमारेषेवरून घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच दहशतवादी राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे. दिल्लीत हल्ला करण्यासाठी जैश-ए-मोहम्मदचे चार दहशतवादी घुसले असल्याची माहिती काही दिवसांपुर्वीच समोर आली होती. दरम्यान गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला करण्यासाठी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने लष्कर-ए-तोएबा आणि हरकत-उल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांशी हात मिळवणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

या योजनेला यशस्वी करण्यासाठी लष्कर-ए-तोएबा आणि हरकत-उल-मुजाहिद्दीनचे स्लीपर सेल जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी मिळून काम करत आहे. याचे नेतृत्व जैशचे कमांडर अबू उस्मान करत आहे. गेल्या आठवड्यात त्यानेच बांदीपुरा भागातील मीर मोहल्ला येथील सफरचंदाच्या बागेत झालेल्या बैठकीत काश्‍मीरमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांना आदेश दिले होते. दरम्यान, या बैठकीची माहिती गुप्तचर संघटनांनी दिल्ली पोलिस आणि अन्य सुरक्षा एजन्सींना दिली होती. या बैठकीत दहशतवादी अबू उस्मान याने दहशतवाद्यांना सांगितले की, काश्‍मीरमधील लोकांना लवकरच एक चांगली बातमी ऐकू येईल. ही आनंदाची बातमी जम्मू आणि दिल्लीमध्ये मोठ्या स्फोटांसह येईल. तेव्हापासून दिल्ली-एनसीआरमधील स्पेशल सेल संशयितांवर छापा टाकत आहे. त्याचबरोबर, दिल्लीमध्ये हाय अलर्ट देत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)