श्रीनगर – जम्मूच्या तुरूंगात कैदेत असणाऱ्या पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या एका सदस्याला सोमवारी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आपल्या ताब्यात घेतले. मुझफ्फर बट (वय 25) असे त्या दहशतवाद्याचे नाव आहे. भारतात जाळे पसरवण्याचा जैशचा नापाक कट काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला. त्या कटानुसार भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी सदस्यांची भरती करण्याचा जैशचा डाव होता. त्याप्रकरणी मार्चमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
एनआयएने केलेल्या तपासादरम्यान त्या कटात सामील असलेल्यांच्या संपर्कात मुझफ्फर असल्याचे निष्पन्न झाले. तो सोशल मीडियावरून म्होरक्यांशी संपर्क साधून होता. नंतर त्याला सार्वजनिक सुरक्षेशी निगडीत कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला जम्मूच्या तुरूंगात ठेवण्यात आले होते. तिथून त्याला एनआयएने ताब्यात घेतले.