जयपूर: जयपूरमध्ये पोलिसांनी ब्लॅकमेलिंग केल्याच्या आरोपाखाली एका महिलेला अटक केली आहे. विशेष म्हणजे ही महिला मिसेस राजस्थान 2019 या सौंदर्य स्पर्धेची विजेती होती. एका व्यापाऱ्याबरोबर अश्लिल व्हिडिओची क्लिप तयार करून ही महिला त्या व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करत होती.
आरोपी प्रियंका चौधरी असं आरोपी महिलेचं नाव असून तिचा पती राजस्थान पोलिसमध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. मात्र पैशाच्या हव्यासापोटी तिने व्यापाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुबाडल्याचं समोर आलं आहे.
प्रियंका चौधरी आणि व्यापाऱ्याची 2016 मध्ये पहिल्यांदा ओळख झाली होती. प्रियंकाने व्यापाऱ्याचं घर भाड्याने घेतलं होत. त्यानंतर प्रियंका चौधरी आणि व्यापारी यांच्यातील जवळीक वाढत गेली. प्रियंकाला जेव्हा व्यापाऱ्याच्या व्यावसायाविषयी माहित पडलं तेव्हा ती त्याच्याकडे पैशांची मागणी करू लागली. तिने व्यापाऱ्याकडून लाखो रुपये घेतले. तसेच लाखो रुपयांचे दागिने देखील घेतले.
दरम्यान माझ्यापासून सुटका मिळवायची असेल तर एक कोटी रुपये रोख रक्कम आणि एक प्लॉट नावावर करावा, अशी अट आरोपीने व्यापाऱ्यासमोर ठेवली होती. तसेच अश्लील व्हिडीओ आणि हेड कॉन्स्टेबल पतीच्या मदतीने तुझ्यावर गंभीर कारवाई करेल, अशी धमकी दिली. आरोपीच्या या अवाजव मागणीला कंटाळून अखेर व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत कारवाई करून आरोपी प्रियंका चौधरीला अटक केली.