#Prokabaddi2019 : जयपूरचा पुण्यावर शानदार विजय

अहमदाबाद – पराभव हा पुणेरी पलटणच्या मानगुटीवरच बसला आहे. गुरूवारी त्यांना प्रो कबड्डी लीगमधील  महत्त्वपूर्ण सामन्यात जयपूर पिंकपॅंथर्स संघाकडून 25-33 अशी हार स्वीकारावी लागली. आतपर्यंत झालेल्या सात सामन्यांमध्ये पुण्याचा हा पाचवा पराभव आहे.

जयपूर संघाने आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये हा पाचवा विजय नोंदविला आहे. त्यांनी पुण्याविरूद्ध पूर्वार्धातच 17-11 अशी आघाडी घेतली होती. सुरूवातीपासूनच त्यांनी चौफेर चढाया व भक्कम पकडी यावर भर दिला होता. नितीन तोमर हा पुण्याचा मुख्य चढाईपटू मानला जातो. जयपूरच्या खेळाडूंनी त्याच्या चढाया निष्प्रभ करण्यावर भर दिला. त्यामुळेच नितीनला केवळ तीन गुणच मिळाले.

चतुरस्त्र व वेगवान खेळ करीत जयपूरने मध्यंतरास 5 मिनिटे बाकी असतानाच पहिला लोण चढविला. तेथूनच त्यांनी सामन्यावरील पकड मजबूत केली. पूर्वार्धात त्यांना मिळालेली 6 गुणांची आघाडी तोडण्यात पुण्याला यश मिळाले नाही. त्यातच उत्तरार्धात 9 व्या मिनिटाला त्यांच्यावर आणखी एक लोण लागला. त्यातून त्यांचा संघ सावरू शकला नाही.

जयपूरच्या दीपक हुडाने 16 चढायांमध्ये 9 गुण घेतले, तसेच त्याने पकडीतही एक गुण मिळविला आणि सुपरटेनची कामगिरी केली. विशाल, नितीन रावळ व संदीप धूल यांनी प्रत्येकी 4 गुण नोंदवित त्याला चांगली साथ दिली. पुण्याकडून पंकज मोहितेने सर्वाधिक 8 गुणांची कमाई केली. सुरजितने तीन गुण मिळविले. उपकर्णधार गिरीश एरनाकला भोपळाही फोडता आला नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)