जयपूर- राजस्थानमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जयपूरमध्ये मोठी कारवाई करत अंमली पदार्थ विभागाच्या इन्स्पेक्टरला 2 लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे या इन्स्पेक्टरचे दोन वर्षापुर्वी लग्न झाले होते तेव्हा फक्त 1 रुपया हुंडा घेऊन लग्न केले होते. असा संदेश देणाऱ्या इन्स्पेक्टरनेच लाच घेतली आहे.
अमन फोगट असे लाच घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून झुंझुनु जिल्ह्यातील सुजानगढ येथील बडसरी बास नावाच्या गावातील रहिवासी आहे. दोन वर्षापुर्वी याच गावात या अधिकाऱ्याचे लग्न झाले असून त्यावेळी केवळ 1 रुपया घेवून या अधिकाऱ्याने लग्न केले होते. त्यावेळी माध्यमांमध्ये बातम्या सुद्धा झळकल्या होत्या व सर्वांनी भरभरून कौतुक सुद्धा केले होते.
राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरोचा एक निरीक्षक आणि राजस्थान पोलिसांच्या एका उपनिरीक्षकासह चार सरकारी अधिकाऱ्यांना तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंमली पदार्थ विभागाचे इन्स्पेक्टर अमन यांनी मेडिकल स्टोअर ऑपरेटरकडून 5 लाख रुपयांची मागणी केली होती, यामध्ये तडजोड होऊन हा सौदा 2 लाख रुपयांमध्ये ठरला. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार फिर्यादीने एसीबीकडे केली होती. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जयपूरमध्ये छापा टाकत यास 2 लाख रुपयाची लाच घेतना रंगेहाथ पडकले.