Air India Landing Fail : महाराष्ट्रातील बारामती येथील विमान अपघातानंतर आता राजस्थानातील जयपूर एअरपोर्टवरही मोठा विमान अपघात होण्याची भीती होती, पण पायलटच्या सतर्कतेमुळे तो टळला आहे. एअर इंडियाच्या फ्लाइट AI-1719 ची लँडिंग फेल झाली, मात्र पायलटने तात्काळ ‘गो-अराउंड’ करून विमान पुन्हा हवेत उडवले आणि दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग केली. या विमानात राजस्थानचे काँग्रेस प्रभारी आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा हे प्रवास करत होते. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. विमान दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी जयपूर एअरपोर्टवर पोहोचले. रनवे टच होताच लँडिंग अस्थिर झाली, ज्यामुळे पायलटने त्वरित विमान पुन्हा उडवले. तब्बल १०-१५ मिनिटे हवेत घिरट्या घालून दुसऱ्या प्रयत्नात विमान सुमारे १ वाजून २० मिनिटांनी सुरक्षित उतरले. गो-अराउंड म्हणजे काय? एअरपोर्ट सूत्रांच्या माहितीनुसार, लँडिंग करताना पायलटला सुरक्षित लँडिंग होणार नाही असे वाटले तर तो विमान पुन्हा हवेत उडवतो आणि नव्याने लँडिंगचा प्रयत्न करतो. ही प्रक्रिया ‘गो-अराउंड’ म्हणून ओळखली जाते. या घटनेत पायलटच्या या त्वरित निर्णयामुळे मोठा अपघात टळला आणि सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. Jaipur Airport Air India Landing Fail सुखजिंदर सिंह रंधावा यांचे जयपूर एअरपोर्टवर पीसीसी चीफ गोविंद सिंह डोटासरा यांनी स्वागत केले. एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितले की, रनवे संपर्कात आल्यानंतर लगेच विमान पुन्हा उडवले गेले, ज्यामुळे कोणताही नुकसान किंवा जखमी झाले नाही. ही घटना बारामतीतील अजित पवार यांच्या विमान अपघातानंतरची आहे, ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. DGCA आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून या घटनेची चौकशी सुरू असून, पायलटच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.