रस्त्यात लुटमार करणारा आरोपी पोलिसांकडून जेरबंद

नगर: दुचाकीस्वारांचा पाठलाग करून, त्यांना हाणमार करून लुटणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने करवाई करून जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी (दि.19) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहिती नुसार सापळा रचून पथकाने आरोपी अजीम ऊर्फ अज्जूू पठाण (वय- 23 वर्षे, रा. फातेमा हौसिंग सोसायटी, प्रभाग क्रमांक 1, श्रीरामपूर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली. सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार इम्रान पिंजारी, (रा. दत्त मंदिराशेजारी, गोंधवणी रोड, श्रीरामपूर) यांनी मिळून केला असल्याची कबुली त्याने दिली. परंतु तो मिळून आला नाही. आरोपी अजीम उर्फ अज्जू पठाण याच्याकडून गुन्ह्यातील चोरलेला 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला.

15 मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी कृष्णा दत्तात्रय रोडगे (वय- 25, रा. भेंडा खुर्द, ता. नेवासा) हे त्यांच्या मोटारसायकलवरुन श्रीरामपूरहून संगमनेरकडे जात असताना श्रीरामपूर-बाभळेश्‍वर रोडवरील ममदापूर फाट्याजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना अडवले. तसेच मारहाण करून 5 हजार रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल, असा एकूण 17 हजार रुपयांचा ऐवज आरोपींनी चोरुन नेला. याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पवार, सहायक फौजदार सोन्याबापू नानेकर, मनोज गोसावी, योगेश गोसावी, भागीनाथ पंचमुख, रवींद्र कर्डिले, संतोष लोंढे, विशाल दळवी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, संदीप दरंदले, चालक बबन साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.