राज्यात चार नवीन कारागृह उभारणार

गृहराज्य मंत्री पाटील ः राज्यात 5 वर्षांत 46 कैद्यांचा मृत्यू

मुंबई – राज्यातील विविध तुरूंगांमध्ये 5 वर्षांत 46 कैद्यांचा अनैसर्गिक मृत्यु झाला आहे. त्यापैकी फक्त 15 जणांनाचा नुकसान भरपाई देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भविष्यात कारागृहात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने कंबर कसली असून कैद्यांची वाढती संख्या आणि अपुरी जागा यामुळे येरवडा, मंडाला, अहमदनगर आणि गोंदिया येथे नवी बंदीगृह तयार करण्यात येणार आहे. तसेच त्यांना योग्य तो आहार मिळावा यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याची माहिती गृहराज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.

विधानसभेत राज्यातील तुरूंगांमधील विविध समस्यांबाबत हर्षवर्धन सकपाळ यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना गृहराज्यमंत्री पाटील बोलत होते. कारागृहाच्या विस्तारासाठी जेथे दोन न्यायाधीश असतील तेथे विकेंद्रीकरण करण्यात येईल. कारागृहात बंद्यांचे अनैसर्गिक मृत्यु होऊ नये यासाठी हेल्थ ग्रुप स्थापन करून एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. कारागृहातील ओपीडी फक्त रेफरेंस सेंटर म्हणून उरले आहेत. तेथील डॉक्‍टर, सोशल वर्कर, त्यांच्या नियुक्‍त्या, सेवा यांचे ऑडिट करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान असतात. त्यासाठी किरकोळ गुन्हांतील बंदी, मोठ्या आणि गंभीर गुन्ह्यातील बंदी यामध्ये फरक करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यासंदर्भात काम करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार चांगली वागणूक असणाऱ्या कैद्यांची शिक्षा कमी करण्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल. ठाणे येथील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असतील तर, नवीन जागा निश्‍चित करून जिल्ह्यांमध्ये नवीन कारागृह उभारण्यात येईल, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.