पुणे – शहराचा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या मुळा-मुठा नद्या सांडपाणी आणि राडारोड्याच्या प्रदूषणाने मरणासन्न अवस्थेत आहेत. या दोन्ही नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापालिकेकडून केंद्र शासनाच्या माध्यमातून जपानमधील जायका कंपनीच्या अनुदानातून मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पास केंद्राने 2015 मध्ये मान्यता दिली असली तरी, गेल्या सहा वर्षांपासून हा प्रकल्प मान्यतेच्या प्रक्रियेतच रखडला आहे. त्यामुळे, या प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाकडून तज्ज्ञ समिती नेमण्यात येणार आहे. यात पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत तसेच बांधकाम विभागातील अभियंते आणि अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. ही समिती या प्रकल्पाच्या निविदा तसेच त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता आणि इतर कामे पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे.
महापालिकेकडून 2016 पासून या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे, राष्ट्रीय नदीसंवर्धन प्रकल्पांतर्गत हा प्रकल्प जायका कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून त्यासाठी केंद्राकडून 991 कोटींचे कर्ज महापालिकेस मिळणार आहे. या योजनेसाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया 2018 पर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षे सुरू होती. त्यानंतर सुमारे वर्ष ते दीड वर्षे या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया सुरू होती.
मात्र, या निविदा चढ्या दराने आल्याने त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर त्या निविदा रद्द करून पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून या निविदा केंद्र शासनाकडे पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, त्याचवेळी या प्रकल्पास आधीच उशीर झाल्याने निविदा प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी जलदगतीने करण्यासाठी पालिकेने आता या प्रकल्पासंदर्भातील तज्ज्ञांची समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.