काटेवाडी : कण्हेरी (ता. बारामती) येथे श्रावणी शनिवार निमित्त घेण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानामध्ये जय अजितदादा पवार व यूगेंद्र श्रीनिवास पवार या दोन्ही भावांनी आखाड्यामध्ये जाऊन एकत्रित कुस्ती लावून एकमेकांची गळाभेट घेतल्याने खऱ्या अर्थाने भावाच्या नात्यामधील गोडवा उपस्थितांना जाणवला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या दोन्ही भावांचे स्वागत केले.
श्रावण महिन्यातील शेवटच्या शनिवारी श्री क्षेत्र कण्हेरी या ठिकाणी मारुती देवाची मोठी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त पहाटे साडेचार वाजता मंदिरातील मारुती देवाचे पुजारी व ग्रामस्थांच्या वतीने देवाची आरती केली जाते. त्यानंतर दुपारी बारा वाजता वाद्याच्या गजरामध्ये पालखी मधून देवाची संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली जाते. लाखो भाविक श्रावण महिन्यातील या शेवटच्या शनिवारी येथील मारुती देवाचे दर्शन घेतात. त्याचबरोबर परिसरामध्ये मोठी यात्रा भरत असल्याने छोटे-मोठे व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. देवाच्या दर्शनाबरोबरच येणारे भाविक महिला या यात्रेमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करतात अतिशय आनंदी वातावरणामध्ये ही यात्रा पार पडते. सायंकाळी चार वाजता या ठिकाणी कुस्त्यांचा मोठा जंगी आखाडा घेतला जातो.
यंदाच्या वर्षी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा सुरू झाल्यानंतर उद्योगपती श्रीनिवास पवार यांनी या ठिकाणी उपस्थित राहून कुस्त्यांचा आनंद घेतला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी या आखाड्यामध्ये प्रवेश केला असता त्यांना खांद्यावरती घेऊन उपस्थिततांनी संपूर्ण कुस्त्यांच्या आखाड्याला फेरी मारून मंचावरती त्यांना विराजमान होण्याची विनंती केली.
यानंतर काही वेळातच उद्योगपती श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव यूगेंद्र पवार यांनी देखील या कुस्त्याच्या आखाड्याला भेट दिली असता उपस्थितांनी त्यांचे देखील मोठ्या उत्साह मध्ये स्वागत केले. यावेळी यूगेंद्र पवार व जय पवार यांनी एकमेकांना अलिंगन देऊन गळाभेट घेतली.त्यावेळी उपस्थितांनी देखील खऱ्या अर्थाने दोन्ही भावांचे एकमेकांबद्दल असलेले प्रेम कशा पद्धतीने आहे याची प्रचिती घेतली. यावेळी सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरामध्ये यूगेंद्र पवार व जय पवार यांचे स्वागत केले. या भरवल्या जाणाऱ्या जंगी कुस्त्यांच्या आखाड्यातील शेवटच्या कुस्ती पर्यंत दोन्ही भाऊ उपस्थित राहून या कुस्त्यांचा आनंद दोघांनीही घेतला. अतिशय उत्साही वातावरणामध्ये यूगेंद्र पवार व जय पवार यांच्या बरोबर आलेल्या सर्व नागरिकांनी व ग्रामस्थांनी कुस्त्यांचा आनंद घेतला.
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोण कोणाच्या विरोधात उभा राहील याबाबत परिसरामध्ये, त्याचबरोबर संपूर्ण राज्यांमध्ये देखील चर्चा सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परंतु नेहमीच आपण सर्व ऐकत आलो आहे की राजकारण राजकारणाच्या जागी आणि कुटुंब हे कुटुंबाच्या जागी हे पवार कुटुंबाची शिकवण असल्या मुळे येणार्या विधान सभेच्या पुढील काळात राजकारणात कोणत्याही पद्धतीने उलथापाल झालेली दिसणार असली तरी देखील जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्या गळाभेटीने मात्र उपस्थितांना दाखवून दिले आहे की आम्ही भाऊ एकच असून आमचे एकमेकांवरील प्रेमही त्याच पद्धतीचे आहे. या दोघांच्या गळाभेटीने मात्र उपस्थित नागरिक अतिशय आनंदी व उत्साही होते. या उत्साही वातावरणामध्ये कण्हेरी यात्रेनिमित्त भरण्यात आलेल्या कुस्त्यांचा जंगी आखाडा मोठ्या जल्लोषामध्ये पार पडला.