आयाराम, गयाराम…जय श्रीराम! – विरोधकांनी विखे-पाटीलांची उडवली खिल्ली

विरोधकांच्या घोषणाबाजीनी विधानभवन दणाणले

मुंबई – कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल होत गृहनिर्माण मंत्रीपद विराजमान झालेले राधाकृष्ण विखे-पाटील यांना टार्गेट करीत आज विरोधी पक्षांनी खिल्ली उडविली. विधानभवन परिसरातच नव्हे तर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत “आयाराम, गयाराम…जय श्रीराम’ अशा घोषणा सभागृहात देत तर विधिमंडळाच्या पायर्यांवर बॅनर झळकवत विखे-पाटलांना लक्ष्य करण्यात आले.

सदस्य नसतानाही मंत्री होता येते – मुख्यमंत्री
विखे-पाटील यांच्या मंत्रीपदाच्या शपथेवरच अजित पवार यांनी आक्षेप घेतला. एखाद्या व्यक्तीने पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच टर्ममध्ये त्याला निवडून न येता दुसऱ्या पक्षाकडून मंत्रिपदाची शपथ घेता येत नाही, असे पवार म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, सभागृहाबाहेरील व्यक्तीला मंत्रीपदाची शपथ घेता येत नाही अशा प्रकारचा कायदा नाही. संविधानाने कुठल्याही पात्र व्यक्तीला मंत्रिपदावर नियुक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसारच पात्र असलेल्या कुठल्याही व्यक्तीला सभागृहाचा सदस्य नसतानाही मंत्री होता येते.

गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच राधाकृष्ण विखे-पाटील यांचे विधिमंडळ परिसरात आगमन होताच कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, गटनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह कॉंग्रेसच्या अन्य सदस्यांनी पायर्यांवरच घोषणाबजीला सुरुवात केली. जय श्री राम.. आयराम गयाराम… असे बॅनर झळकवण्यात आले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होताच विकासाची सर्व स्वप्ने भंग, सरकार मंत्रिमंडळ विस्तारात दंग, आले रे आले चोरटे आले… अशी घोषणाबाजी करीत बॅनरही झळकविण्यात आले. विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडून नवीन मंत्र्यांचा परिचय करून दिला. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील उभे राहताच पुन्हा आयाराम, गयाराम जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.