नवी दिल्ली – काही महिन्यांपूर्वी तामिळ सुपरस्टार ‘सूर्या’ची प्रमुख भूमिका असलेला “जय भीम’ सिनेमा अमेझॉनवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट देशभरात चर्चेचा विषय ठरलाय. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाच्या कथानकापासून अभिनय, दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचं जोरदार कौतुक झालं आहे.
या चित्रपटात प्रकाश राज, मनिकंदन, गुरू सोमसुंदरम, अभिनेत्री लिजो मोल जोस, राजिशा विजयन या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. जगभरात या चित्रपटाचा बोलबाला झाला असून, आता तर चित्रपट सृष्टीत मानाचं स्थान असलेल्या ऑस्कर अकॅडमीने या चित्रपटाचा विशेष सन्मान केलाय. यामुळे सर्व भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत.
ऑस्करने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर ‘जय भीम’ चित्रपटाला स्थान दिलंय. या चॅनलवर ऑस्कर अकॅदमीचे सदस्य असलेल्या प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांच्या मुलाखती आणि चित्रपटांचे सीन दाखवले जातात. असा सन्मान मिळवणारा जय भीम पहिला तामिळ चित्रपट ठरला आहे.
एका विशिष्ट आदिवासी समुहावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनीच या चित्रपटाचे तुफान कौतुक केले आहे. ऑस्करने जय भीम चित्रपटाचा जो व्हिडीओ प्रकाशित केलाय त्यात या चित्रपटातील काही विशेष सीन दाखवण्यात आले आहेत. सध्या हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.