– श्रीनिवास वारुंजीकर
पुणे – स्वराज्य संस्थापक आणि महान मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि पुण्यतिथी आपण महाराष्ट्रात जोशात साजरी करतोच. पण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीपसून हजारो किलोमीटर्स दूरवर, अमेरिकेच्या मिशिगन राज्यातल्या डेट्रॉईट शहरातल्या प्रतिष्ठीत बेव्हर्ली हिल्समधील सभागृहात, यावर्षीच्या शिवजयंतीला (19 मार्च) सादर झालेल्या ‘श्रीमंत योगी – राजा शिवछत्रपती’ या संगीतमय नाटकाला मिळालेला मराठीसह भारतीय प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, अमेरिकेतही आता शिवचरित्राविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचे पहायला मिळते आहे.
या कार्यक्रमावेळी प्रेक्षकांनी एका सुरात ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला आणि उपस्थितांच्या अंगावर विरश्रीयुक्त रोमांच उभे राहिले. मूळच्या सातारच्या आणि अमेरिकेत स्थायिक झालेल्या संगीत विशारद, गायिका सायली वैद्य (मनपाठक) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची कथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच पेलली. अमेरिकेत हिंदुस्तानी संगीत लोकप्रिय करण्यासाठी त्या त्यांच्या ‘रागाबिट्स’ या संस्थेच्या’ माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत आहेत.
अमेरिकेतील मराठी कुटुंबात अनेकदा आपल्या इतिहासाविषयी माहिती कमीच आढळते. तेथे स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबांतील पालकांना आणि नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती मिळावी आणि जाज्वल्य इतिहासाची त्यांना ओळख व्हावी, या हेतूने ‘रागाबिट्स’च्या सायली वैद्य यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजिनीअर असलेल्या, सायली वैद्य यांचे पती सागर यांनी ही कल्पना उचलून धरली.
मिराया फिटतर्फे नाटकातील नृत्यांची जबाबदारी सांभाळली गेली. करोना, ओमायक्रॉनच्या निर्बंधांवर मात करत या कार्यक्रमाची वाटचाल सुरु झाली. एकूण 50 कलाकारांचा संच असलेल्या या कार्यक्रमचे ज्योती सोमण, अमित देशपांडे यांनी केले. नृत्य दिगदर्शन मुक्ता जोशी, नेपथ्य गौरी अलाटे, ध्वनी अभिजाय काणे, प्रकाश योजना – सतीश सुब्रमण्यन आणि संगीत संयोजन – सागर वैद्य यांनी केले.
यासोबत भूषण कुलकर्णी, उल्का भिडे, विक्रांत पटवर्धन, ऋतुराज कुलकर्णी आणि बाल शिवाजीच्या प्रमुख भूमिकेतील आणि आपल्या बहारदार पोवाड्याने सर्व रसिक प्रेक्षकांची विशेष दाद मिळवणार्या छोट्या आदीश वैद्यचे विशेष कौतुक झाले. नाट्य, नृत्य, गायन आणि सोबतीला समर्पक निवेदनाची जोड असल्याने हे संगीतमय नाट्य भारतीय तसेच अमेरिकन प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे.
काय आहे या संगीतमय नाट्यात?
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ले शिवनेरीवरील जन्म, रायरेश्वरावर शिवरायांनी घेतलेली स्वराज्याची शपथ, दादोजी कोंडदेव यांनी बालशिवरायांना दिलेले प्रशिक्षण, अफझलखान भेटीचे नियोजन आणि खानाचा वध, पावनखिंडीतील बाजीप्रभुंचे अपार साहस आणि छत्रपती शिवरायांवर राजधानी रायगड येथे झालेला राज्याभिषेक अशा विविध प्रसंगांना साभिनय
आणि सांगितिक सादरीकरणाद्वारे वीरश्रीयुक्त पोवाड्यांसह या कार्यक्रमात जिवंत करण्यात आले. बेव्हर्ली हिल्सच्या ग्रुव्हज हायस्कूलच्या रंगमंचावर सादर झालेल्या या कार्यक्रमाला 400 हून अधिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला, हे विशेष. अमेरिकेत शिवचरित्र सर्वदूर पोहोचवण्याच्या प्रयत्नांना यश येत आहे.
शिवकालीन वेशभूषा अशी अनेक आव्हाने स्वीकारून अतिशय कमी वेळात या नाटकाचा सेट उभा करण हे आमच्यासाठी एक खूप मोठे आव्हान होते. अमेरिकेत भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून सध्याची तरुण पिढी आणि लहान मुले प्रेरित व्हावी या हेतूने ‘श्रीमंत योगी’चे अमेरिकेत अनेक प्रयोग करायचा आमचा मानस आहे.
– सायली वैद्य, निर्माती दिग्दर्शक