साखरेपाठोपाठ गूळ उत्पादनाला पुरामुळे कडवटपणा

उसाचे पीक पाण्यात, शेतकऱ्यांची कोंडी : उत्पादनात घट होण्याची शक्‍यता

पुणे – महापूर आणि अतिवृष्टीमुळे पश्‍चिम महाराष्ट्राला बसलेल्या फटक्‍याचा अंदाज आता हळुहळू येत आहे. या भागातील साखर उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता गूळ उत्पादनालादेखील त्याची झळ पोचणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्याची मोठी कोंडी झाली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्राचा भाग साखरपट्टा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे याठिकाणच्या साखर व गुळ उत्पादनांना राज्याबरोबरच परराज्यांतूनही मोठी मागणी असते. मात्र, गेल्या दोन महिन्यांत पश्‍चिम महाराष्ट्राला अतिवृष्टीचा दोनदा फटका बसला आहे. एका धक्‍क्‍यातून साखर उत्पादक शेतकरी सावरत असतानाच महिनाभराच्या कालावधीनंतर पुन्हा अतिवृष्टीमुळे ऊस पाण्याखाली गेला. आगोदरच आठ ते दहा फूट पाण्यात राहिलेल्या ऊस पिकाचे नुकसान झाले असताना, पुन्हा उसाच्या फडात पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांना ऊसाच्या पिकाची चिंता सतावत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्‍यातील पंचगंगेच्या काठानजीकचा ऊस गुळासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणची दहा ते बारा गावे केवळ गूळ उत्पादन घेण्यावर भर देतात. त्याठिकाणच्या गुळाला असलेल्या अवीट गोडव्यामुळे हा गूळ बाजारपेठेत “क्रीम गूळ’ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, पंचगंगेजवळची ऊस शेती दोनदा पाण्याखाली आल्याने, गुळाचे उत्पादन सुरू होऊ शकलेले नाही.

घटस्थापनेनंतर विशेषत: गुजरातमधील व्यापारी गुळाचा सौदा करण्यासाठी याठिकाणी येत असतात. मात्र, पुराच्या फटक्‍यानंतर काही अपवाद वगळता बहुतांशी ठिकाणची ऊस गुऱ्हाळे अद्यापही सुरू झालेली नाहीत. तर सांगली आणि कर्नाटकमधील गुळाची आवक सुरू झाली आहे. स्थानिक बाजारपेठेत या दोन ठिकाणचा गुळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, करवीरचा गुळ अद्यापही बाजारपेठेत दाखल झाला नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या गुळ उत्पादनात 4 टक्के घट होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.