जाधव, चोरगे, गायकवाडांची मते ठरणार निर्णायक

मागील निवडणुकीच्या तुलनेत निम्मेच उमेदवार रिंगणात

सातारा – सन 2014 च्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत लक्षवेधी मते प्राप्त केलेले पुरुषोत्तम जाधव, राजेंद्र चोरगे, अशोक गायकवाड यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत. त्यामुळे स्वाभाविक त्यांना व पक्षाला मिळालेली मते यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. त्याचबरोबर मागील निवडणुकीत 18 उमेदवार आखाड्यात होते तर सध्या निवडणुकीत 9 उमेदवार आखाड्यात आहेत. साहजिकच अपक्ष उमेदवारांची संख्या कमी झाली असल्यामुळे त्याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मागील निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढविलेले पुरुषोत्तम जाधव यांना 1 लाख 55 हजार, आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढविलेले राजेंद्र चोरगे यांना 82 हजार 489, रिपाइंचे अशोक गायकवाड यांना 71 हजार 808 मते मिळाली होती. तिन्ही उमेदवारांची मतांची संख्या तीन लाखांपेक्षा अधिक आहे. मात्र, तिन्ही उमेदवार यंदाच्या निवडणुकीत उतरलेले नाहीत. त्याचबरोबर संदीप मोझर यांना 18 हजार 215, सुभाष शिलवंत 15 हजार 73, प्रशांत चव्हाण यांना 14 हजार 523, अल्ताफ शिकलगार यांना 13 हजार 760, चंद्रकांत खंडाईत 12 हजार 270, सुभाष देशमुख 12 हजार 122, पांडुरंग 11 हजार 304, सागर उत्तमराव कदम 10 हजार 47, वर्षा माडगुळकर यांना 9 हजार 405 यांच्यासह उर्वरित तीन उमेदवारांनी चार अंकी मते प्राप्त केली होती.

हे सर्व उमेदवार यंदाच्या निवडणुकीत उतरलेले नाहीत. मात्र, मागील निवडणुकीतील विजयी उमेदवार खा.उदयनराजे यांच्यासह अभिजीत बिचुकले यांची उमेदवारी कायम आहे. त्या निवडणुकीत खा.उदयनराजेंना मिळालेल्या मतांची टक्केवारी 52 टक्के इतकी तर विरोधी उमेदवारांना 48 टक्‍के मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या रोडावली आहे. मागील निवडणुकीत 18 तर यंदाच्या निवडणूकीत 9 उमेदवार रिंगणात आहेत. लक्षवेधी मते प्राप्त केलेल्या उमेदवार निवडणुकीपासून दूर आहेत. त्याचबरोबर अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बदलेल्या सर्व गणितांचा फायदा कोणत्या उमेदवाराला होतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.