जडेजा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक – प्रवीण आमरे

मुंबई –भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्याच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे, असे मत माजी कसोटीपटू प्रवीण आमरे यांनी व्यक्त केले आहे.

जडेजाच्या रुपाने संघाला एक अव्वल डावखुरा फिरकी गोलंदाज, एक उपयुक्त फलंदाज व सर्वोत्तम क्षेत्ररक्षक गवसला आहे. सध्याच्या क्रिकेटमधील विविध संघांचे बलाबल पाहिले तर लक्षात येते की संघात किमान दोन ते तीन अष्टपैलू असावे असाच कल असतो. जडेजासारख्या खेळाडूला केवळ टी-20 किंवा एकदिवसीय सामन्यातच खेळवले पाहिजे असा विचार करण्यापेक्षा कसोटी क्रिकेटमध्येही त्याचा एखाद्या ट्रमकार्डप्रमाणे वापर करुन घेतला पाहिजे. केवळ भारतीय खेळपट्ट्यांवरच फिरकिला साथ मिळते म्हणून जडेजाला खेळवले पाहिजे असे नाही तर ज्या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते तिथे देखील कसोटी सामन्यात चौथ्या व पाचव्या दिवशी फिरकीला मदत मिळते व त्यामुळे जडेजासारखा खेळाडू संघात असणे अत्यंत आवश्‍यक असते, असेही आमरे यांनी सांगितले.

जाडेजाचे क्षेत्ररक्षण पाहताना लक्षात येते की चेंडू ग्रॅब करणे व त्याचक्षणी थ्रो करणे यासाठीचा अत्यंत अचूक अंदाज त्याला अन्य क्षेत्ररक्षकांपेक्षा जास्त लवकर येतो. त्याच्या खांद्यात ताकद असल्यामुळे फलंदाज त्याच्याकडे चेंडू असताना दुसरी धाव घेण्याचे टाळतात. त्याची काही सामन्यातील कामगिरी पाहता त्याने अनेक सामन्यांत चपळ क्षेत्ररक्षण करुन संघाला अनेक सामन्यात अविश्वसनिया विजय मिळवून दिले आहेत. असे आणखी किमान दोन खेळाडू भारताला मिळाले पाहिजे, असेही आमरे म्हणाले.

कर्णधार विराट कोहली, मनीष पांडे, रोहित शर्मा हे देखील उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून गणले जातात. मात्र, जडेजा असा खेळाडू आहे की त्याला स्लिप, कव्हर, शॉर्ट लेग, शॉर्ट पॉइंट किंवा थेट सिमारेषेवर असे कुठेही उभे केले तरी त्याच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा कुठेही कमी होत नाही. त्याची तंदुरुस्ती आज संघातील इतर खेळाडूंपेक्षाही चांगली आहे. येत्या काळातही त्याचा खुबीने वापर केला गेला पाहिजे, असेही मत आमरे यांनी व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.