नवी दिल्ली – मनी लॉन्डरिंग प्रकरणी चौकशीची गरज भासू शकते, म्हणून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला आज परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले. जॅकलीनच्या विरोधात लुक आऊट सर्क्युलर बजावण्यात आले असल्यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून मुंबई विमानतळावर जॅकलीनला रोखले.
सक्तवसूली संचनालयाकडून नंतर विमानतळावर जाऊन जॅकलीनला चौकशीसाठी उपस्थित रहावे लागणार असल्याची माहिती दिली. या कारणामुळे तिला परदेशात जाता येणार नाही आणि देशातच रहावे लागणार असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिला सांगितले.
सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी लीना मारिया पॉल यांच्याशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसची आतापर्यंत अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीने आज मनी लॉन्डरिंग विरोधी कायद्यांतर्गत विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये चंद्रशेखर, त्यांची पत्नी आणि अन्य 6 जणांचा उल्लेख आहे.
चंद्रशेखर याने डॅकलीन हिला अनेक उंची भेटवस्तू दिल्या होत्या. त्यामध्ये पर्शियन मांजरी आणि एका घोड्याचाही समावेश आहे. फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांच्या पत्नी आदिती सिंग यांच्यासह अन्य काही हायप्रोफाईल व्यक्तींची फसवणूक केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी बॉलिवूडमधील आणखीन एक अभिनेत्री नोरा फतेही हिचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे.