मुंबई – 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांचे नाते सध्या चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर या प्रकरणात ईडीचे अधिकारी सर्वांचीच कसून चौकशी करत आहेत. यामध्ये अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांचाही समावेश असून या दोघींची ही सतत चौकशी करण्यात येत आहे. अश्यातच आता बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने एक खळबळजनक विधान केलं असून, यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
जॅकलिनने तिच्या जबाबात म्हटलंय, “सुकेश माझ्या भावनांशी खेळला आणि त्याने माझं आयुष्य, करिअर उद्ध्वस्त केलं आहे. त्याने माझी फसवणूक केली’ असं ती म्हणाली आहे. यावेळी जॅकलिन म्हणाली… “माझी आणि सुकेशची शेवटची भेट 8 ऑगस्ट 2021 रोजी झाली होती. त्यानंतर आम्ही एकमेकांना संपर्क केला नव्हता. नंतर मला समजलं की सुकेशला अटक करण्यात आली आहे. पिंकी आणि शेखर या दोघांनी माझी फसवणूक केली. मला धोका दिला.
मला जेव्हा त्याच्या क्रिमिनल बॅकग्राऊंडविषयी समजलं, तेव्हा पहिल्यांदाच मला त्याचं खरं नाव सुकेश असल्याचं समजलं. पिंकीला सर्वकाही माहीत होतं, पण तिने कधीच मला सांगितलं नव्हतं’. असे आरोप जॅकलिनने केले आहेत. दरम्यान, आता अभिनेत्रीच्या या आरोपामुळे या प्रकरणाला आणखी कोणते नवीन वळण मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.