नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने सुकेश चंद्रशेखर आणि इतरांशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिलाही आरोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात आजच आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. आणि त्यात जॅकलीनला आरोपी म्हणून कोर्टापुढे हजर राहण्याची नोटीस जारी केली जाईल.
या प्रकरणात 36 वर्षीय अभिनेत्रीची ईडीने अनेकवेळा चौकशी केली आहे, शेवटची चौकशी जूनमध्ये झाली होती. श्रीलंकेची नागरिक असलेल्या या अभिनेत्रीने 2009 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह गुन्हेगारी कृत्यांमधून मिळालेल्या पैशातून जॅकलिन फर्नांडिसला 5.71 कोटी रुपयांच्या विविध भेटवस्तू दिल्या होत्या.
या प्रकरणात सहआरोपी असलेल्या पिंकी इराणी हिच्या मार्फत या भेटवस्तू जॅकलीनला देण्यात आल्या आहेत असे ईडीने निवेदनात म्हटले होते.या भेटवस्तूंव्यतिरिक्त, चंद्रशेखर यांनी फर्नांडिसच्या जवळच्या कुटुंबीयांना 1,72,913 अमेरिकन डॉलर्स(सध्याच्या विनिमय दरानुसार सुमारे 1.3 कोटी रुपये) आणि महागड्या गाड्याही तिला भेट दिल्या होत्या.