मुकेश अंबानींनी पहिला क्रमांक गमावला
मुंबई :’करोना व्हायरस’च्या वादळाने जगभरातील गर्भश्रीमंतांच्या संस्थांनांना जोरदार तडाखे दिले आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत म्हणून मागील दोन वर्ष अव्वल स्थानी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुकेश अंबानी यांना देखील जबर आर्थिक फटका बसला आहे.
शेअरमधील घसरणीने अंबानी यांच्या संपत्तीत घसरण झाली आहे. भांडवली बाजारात ‘रिलायन्स’च्या शेअरमध्ये प्रचंड पडझड झालीआहे. ‘ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स’नुसार आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आता ‘अलिबाबा’चे संस्थापक जॅक मा अव्वल स्थानी विराजमान झाले आहेत.
जॅक मा यांची संपत्ती 44.5 अब्ज डॉलर असून अंबानी यांच्या तुलनेत ती 2.6 अब्ज डॉलरने जास्त आहे. यामुळे आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीचा बहुमान अंबानी यांना गमवावा लागला आहे.
‘ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स’नुसार गेल्या काही आठवड्यात जगभरातील श्रीमंतांच्या संपत्तीत प्रचंड घट झाली आहे. ‘ब्लूमबर्ग वेल्थ रॅंकिंग’मधील टक्क्यांहून अधिक अब्जाधीशांना यंदा जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेचा फटका बसला आहे.
त्यातील बहुसंख्य श्रीमंतांचे उद्योग ‘करोना’मुळे प्रभावित झाले आहेत. शेअर बाजाराला धडकलेल्या ‘करोना व्हायरस’च्या वादळात अंबानी, अदानी, अझीम प्रेमजी, उदय कोटक यासारख्या बड्या उद्योजकांच्या शेअर्सची दाणादाण उडवली आहे.