नवी दिल्ली – कोणत्याही कारणाशिवाय मी आणि माझ्या वडिलांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. हे नवे जम्मू काश्मिर आहे, अशा शब्दात जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष अमर अब्दूल्ला यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
ऑगस्ट 2019 नंतरचे हे नवे जम्मू काश्मिर आहे. आम्हाला कोणतेही कारण न सांगता आमच्या घरात नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. सध्याचे विद्यमान खासदार असणाऱ्या माझ्या वडिलांना नजर कैदेत ठेवतात, हे पुरेसे वाईट आहे. माझ्या घरात मी, माझी बहीण आणि तिची मुलै कैदेत आहोत, असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी त्यांच्या घराबाहेर उभ्या असणाऱ्या बुलेटप्रूफ वाहनांची छायाचित्रेही पोस्ट केली आहेत.
आम्हाला घरात नजर कैदेत ठेवले हे ठिक आहे. पण आमच्या घरात काम करणाऱ्यांना घरात येऊही दिले जात नाही. तरी तुम्ही मी रागावत असल्याने आश्चर्य व्यक्त करता, असे दुसरे ट्विट त्यांनी केले आहे.
पोलिसांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले नाहीत. ते म्हणाले, पुलवामा हल्ल्याच्या दुसऱ्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे.
त्यामुळे रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. महत्त्वाच्या आणि संरक्षण असणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींवर निर्बंध आणण्यात आले आहेत. या सर्व व्यक्तींना त्याची पूर्व कल्पना आधीच देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनीही असाच आरोप केला आहे.